१९ जून २०१९
सतर्क राहायलाच हवे
मॉन्सूनची सध्याची हवामानशास्त्रीय स्थिती फारशी आशादायक नाही
—————————–
जूनची १९ तारीख आली तरी महाराष्ट्रात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. येत्या काही तासांत महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन जाहीर होईलही. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) दहा दिवसांच्या अंदाजामध्ये येत्या आठवडाभराच्या कालावधीत महाराष्ट्रात पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. असे असूनही सध्याची हवामानाची निरीक्षणे परिस्थिती फारशी चांगली नसल्याचेच दर्शवत आहेत. मान्सूनच्या प्रगतीसाठी हवामानाची आदर्श नसताना दुसरीकडे राज्यातील पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे. आजमितीला राज्यात एकूण फक्त सहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. खरिपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. सध्याची हवामानाची स्थिती आणि आयएमडीसह अनेक मॉडेलचे पुढील महिनाभराचे अंदाज पाहिले, तर पुढील २० दिवसांत मोठ्या पावसाची अपेक्षा नाही. ही खरेतर आणीबाणीची स्थिती असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व स्तरांतून लवकरात लवकर पावले उचलायला हवीत.
मॉन्सूनसाठी सध्या हवामान कसे आहे?
वायू चक्रीवादळामुळे अरबी समुद्रावर जमा झालेले बहुतांश बाष्प निघून गेले. वादळामुळे मॉन्सूनच्या वाऱ्यांचा बिघडलेला प्रवाह जमिनी लगतच्या वातावरणात काहीसा सुरळीत झाला असला तरी, मॉन्सून प्रवाहाने अद्याप वातावरणात अपेक्षित उंचीच गाठलेली नाही. मॉन्सूनचे नैऋत्य मोसमी वारे समुद्र सपाटीपासून ते वातावरणात साधारणपणे सहा किलोमीटर पर्यंतच्या उंचीवर प्रवाहीत असतात. सध्या त्यांची उंची समुद्र सपाटीपासून फक्त दीड – दोन किलोमीटरपर्यंतच असल्याचे दिसून येत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वर वातावरणात सहा किलोमीटर उंचीवर पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह वाहू लागतो. सध्या हा प्रवाह दहा किलोमीटर उंचीवर आहे. थोडक्यात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक आदर्श स्थिती तयार झालेली नाही. समजा काही दिवसांमध्ये हे प्रवाह सुरळीत झाले, तरी पुरेशा बाष्पाअभावी येत्या काही दिवसांत मोठ्या पावसाची शक्यता कमीच आहे.
winds at 700 hpa 19 June 19
येत्या तीन ते चार दिवसांमध्ये बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. हे क्षेत्र नंतर मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यातून महाराष्ट्राला काही प्रमाणात पाऊस मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा मॉन्सूनच्या प्रगतीत आणि पावसात खंड पडण्याचे संकेत काही मॉडेलमधून मिळत आहेत. संपूर्ण जून आणि पावसाचा महिना मानल्या जाणाऱ्या जुलैच्या पूर्वार्धापर्यंत मोठा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता अंदाजांमधून व्यक्त होत आहे आणि हवामानाची सध्याची निरीक्षणेही त्याला दुजोरा देत आहेत.
हवामान अंदाज काय सांगतो?
आयएमडीच्या आठवड्याभराच्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात ओडिशा जवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, ते पुढे मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे २४ ते २८ जून दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. आयआयटीएमच्या चार आठवड्यांच्या पावसाच्या अंदाजानुसार २७ जून ते ३ जुलैच्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून, त्यापुढील आठवड्यात पुन्हा पावसाची शक्यता कमी आहे.
indres_rfanom_MME2019061200
महाराष्ट्रात सध्या पाण्याची स्थिती काय?
राज्यात सर्व धरणांत मिळून १९ जून रोजी एकूण उपयुक्त पाण्याचा साठा केवळ ६.३५ टक्के इतका आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा १७.३३ टक्के होता.  विभागनिहाय पाहिल्यास अमरावती विभागात सध्या ६.०८ टक्के, औरंगाबाद विभागात ०.५ टक्के, कोकण २४.५३ टक्के, नागपूर ५.६६ टक्के, नाशिक ४.८५ टक्के, पुणे ५.८५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
– टीम सतर्क
१९ जून २०१९